माद्रिद : स्पेनमध्ये बुधवारी (२८ ऑक्टोबर) झालेल्या भीषण रेल्वे अपघातात ६९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य स्पेनमधील टोलेडो प्रांतातील उर्दा शहराजवळ दोन हायस्पीड ट्रेनची धडक झाली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण स्पेनमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माद्रिदहून सेव्हिलच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेनचा या अपघातात समावेश होता. रेल्वे सिग्नलिंग आणि नियंत्रण यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर एका ट्रेनला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पुढे थांबलेल्या ट्रेनला दुसऱ्या ट्रेनने मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अनेक डबे रुळावरून घसरले आणि मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि विशेष बचाव पथकांची मदत घेण्यात आली.

या दुर्घटनेनंतर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून रेल्वे सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटींचीही चौकशी केली जात आहे.