देशात पुन्हा एकदा भारताचे संविधान बदलण्यासाठी आणि राजकीय व्यवस्था संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत काँग्रेस प्रयत्न करत आहेत, असा अत्यंत गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आज आपण मैदानात उतरलो आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. लोकशाही बचाव पदयात्रेदरम्यान विरोधकांवर हल्लाबोल करताना त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.


विरोधकांच्या आंदोलनावर ताशेरे ओढताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांचा नारा हा केवळ सरकार बदलण्याचा नसून 'रेजिम चेंज' (Regime Change) करण्याचा आहे. 'रेजिम चेंज'चा अर्थ देशाची राजकीय व्यवस्था बदलणे, संविधान बदलणे आणि देशातील संपूर्ण प्रमुख संस्था उद्ध्वस्त करणे असा होतो. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेत जसे 'रेजिम चेंज' घडवून आणत संविधान बदलण्यात आले, त्याच धर्तीवर भारतातही हालचाली सुरू आहेत. काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदांमध्ये वारंवार 'रेजिम चेंज' करायचा असल्याचे म्हटले आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच, उद्धव ठाकरे यांना या शब्दाचा अर्थ खरोखरच माहिती आहे का, असा सवाल करत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही रेजिम चेंज होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.